जळगाव : प्रतिनिधी
औरंगाबाद हायकोर्टाकडून किनोदच्या लोकनियुक्त महिला सरपंच प्रियांका सूर्यवंशी ह्यांच्या विरोधातील अविश्वास प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे.
२०१७ साली तालुक्यातील किनोद गावाच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून प्रियंका सूर्यवंशी ह्या निवडून आल्या होत्या. गावातील अंतर्गत कलह तसेच नाराज ग्रामपंचायत सदस्य यांनी दिनांक १५ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव पारित केला होता. एकूण ८ सदस्यांपैकी ६ सदस्यांनी अविश्वास ठरावास संमती दर्शवली होती. सदर अविश्वास ठरावास मान्यता देण्यासाठी दिनांक २९ ऑक्टोंबर २०२१ रोजी विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्व ग्रामस्थांनी मतदान करून आपला मतदानाचं हक्क बजावला होता. अविश्वास ठराव मान्यतेच्या दिवशी एकूण ६४५ मतदान झाले होते त्यात २८५ मतदान हे अविश्वास ठरावाच्या बाजूने व २०९ मतदान अविश्वास ठरावाच्या विरोधात झाले होते तसेच १५१ मतदान हे बाद घोषित करण्यात आले होते. म्हणजेच ग्राम सभेतही अविश्वास ठराव मतदान हे याचिकाकर्त्या सरपंच यांच्या विरोधात गेले होते.
सदर अविश्वास ठरावाच्या विरोधात याचिकाकर्त्या सरपंच यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या समोर ग्राम पंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ (३)(ब ) अन्वये विवाद अर्ज दाखल केलेला होता. सदरील विवाद अर्ज मा. जिल्हाधिकारी जळगाव यांनी फेटाळून अविश्वास ठराव कायदेशीर असल्याचे आपल्या निकालात म्हटले होते व प्रियंका सुरवंशी ह्यांना सरपंच राहण्यापासून अपात्र ठरवले होते.
मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजीच्या निकालाने व्यथित होऊन याचिकाकर्त्या सरपंच यांनी औरंगाबाद हायकोर्टात रीट याचिका दाखल केली होती. जरी सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव पारीत झाला असला आणि जरी संपूर्ण गावाने अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले असले तरी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव हा ग्राम पंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ (१) नुसार एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांकडून तहसीलदारांपुढे सादर केला गेला नाही म्हणून संपूर्ण अविश्वास प्रक्रियाच रद्दबातल ठरण्यास पात्र आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांचे वकील जितेंद्र पाटील ह्यांच्याकडून केला गेला. सदर याचिकेत मा.जिल्हाधिकारी जळगाव तसेच ग्रामपंचायतीचे निवडून आलेले मेंबर ह्यांना प्रतिवादी करण्यात आले होते. याचिकेत दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी सुनावणी होऊन मेहरबान हायकोर्टाने जिल्हाधिकारी जळगाव यांनी दिलेला दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजीचा निकाल रद्द ठरवत संपूर्ण अविश्वास प्रक्रियाच मुळात बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे.
एकूण ८ मेंबर्स पैकी 6 विरोधात असताना तसेच ग्रामसभेतील मतदान देखील सरपंचांच्या विरोधात असताना केवळ कायदेशीर प्रक्रिया लक्षपूर्वक पार न पडल्यामुळे संपूर्ण अविश्वास प्रक्रिया मे.हायकोर्टाकडून रद्द ठरवण्यात आली. मे. हायकोर्टाने संपूर्ण अविश्वास प्रक्रियेस केराची टोपली दाखवत प्रियंका सूर्यवंशी ह्याच किनोदाच्या सरपंच राहतील असे जाहीर करून किनोदच्या लोकनियुक्त सरपंच यांना मोठा दिलासा दिला आहे. सदर संपूर्ण प्रक्रियेत मे. हायकोर्टात याचिकाकर्त्यांच्या बाजूने ऍड. जितेंद्र विजय पाटील ह्यांनी काम बघितले.