नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या कथित मद्यधोरण घोटाळ्यासंबंधात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य १४ लोकांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. सीबीआयने गुन्हा नोंदवलेल्याच १५ लोकांची नावे या लुकआउट नोटिशीमध्ये आहेत.
मनीष सिसोदिया यांच्या घरी शुक्रवारी सीबीआयने छापे टाकले होते. त्यानंतर केजरीवाल सरकारने केंद्र सरकारविरोधात टीका केली होती. तसंच, मनीष सिसोदिया यांनीही येत्या दोन-चार दिवसांत मला अटक केली जाईल, असं म्हटलं होतं. मनीष सिसोदिया यांनी शक्यता वर्तवल्यानंतर २४ तासांतच सीबीआयने सिसोदिया यांच्यासह १४ लोकांविरोधात लुकआऊट नोटिस जारी केली आहे. सीबीआयची ही लुकआउट नोटिस सिसोदियांसह केजरीवाल यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. कारण, आता सिसोदियांसह हे १४ जणांना देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर त्यांनी असा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.
काय केले सीबीआयने आरोप
सीबीआयच्या कार्यालयात शनिवारी सिसोदिया यांच्या निकटवर्तीयांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते. सिसोदिया यांच्याशी संगनमत करून अमित अरोरा, दिनेश अरोरा आणि अर्जुन पांडेय यांनी परवानाधारकांकडून मिळालेला अवैध पैसा वळवल्याचे पुरावे मिळाले असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. थेट लाभ पोहोचविण्यासाठी अबकारी विभागात मोठ्या प्रमाणात खोट्या नोंदी करण्यात आल्या. सिसोदिया यांच्या एका सहकाऱ्याच्या कंपनीला कथितपणे एक कोटी रुपये देण्यात आल्याचाही दावा सीबीआयने केला आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी विशेष न्यायालयापुढे सीबीआय माहिती सादर करेल आणि दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत ईडीला देण्यात येईल, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
‘केजरीवालच भ्रष्टाचाराचे सूत्रधार’
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचा आरोप मोदी सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला. ‘राजकारणात उतरण्यापूर्वी केजरीवाल भ्रष्टाचार संपविण्याचे आंदोलन करीत होते; पण आतापर्यंत त्यांनी भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. मद्य धोरणात भ्रष्टाचार नव्हता, ते एवढे चांगले होते, तर ते मागे का घेतले?’ काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या मद्य कंपन्याना कंत्राट का दिले, असे सवाल करून केजरीवाल सरकार रेवडी आणि बेवडी सरकार असल्याची टीका ठाकूर यांनी केली. मनीष सिसोदिया यांच्या नावाचीही त्यांनी ‘मनी’-ष अशी फोड केली.