धरणगाव : प्रतिनिधी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आज धरणगावात ज्या मार्गाने आगमन होणार आहे. त्याच मार्गावरील बॅनर फाडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. यामुळे काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
“शिव संवाद” यात्रा दौरा आज दि.२० ऑगस्ट, शनिवारी दुपारी १ वाजता धरणगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आयोजित केला आहे. यानिमित्ताने धरणगाव शहरात शिवसेना व युवा सेना कडून आदित्य ठाकरे यांचे स्वागत बॅनर जागोजागी लावले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री काही अज्ञातांकडून शहरातील गणेश नगर, हेडगेवार नगर, व उड्डाण पुलाजवळ शिव संवाद यात्रेचे स्वागत बॅनरवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बॅनर फाडल्याचा प्रकार पाहायला मिळाला. जवळपास सहा ते सात ठिकाणी हे बॅनर फाडण्यात आल्याचे कळतेय. द्वेष भावनेतून शिवसेना, युवासेनेचे स्वागत फलक (बॅनर) फाडल्याचा संशय शिवसैनिकांनी व्यक्त केला असून, या घटनेमुळे शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल खताळ व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी उपनगराध्यक्ष देविदास बापू महाजन, नगरसेवक वासुदेव चौधरी, भागवत चौधरी, किरण अग्निहोत्री, रविंद्र जाधव, भरत माळी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सूचना दिल्या.
बॅनर फाडणाऱ्यांचा मध्यरात्री शोधाशोध
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे स्वागतपर लावलेले बॅनर फाडल्याचा प्रकार लक्षात येताच संतप्त शिवसैनिकांनी समाज कंटकांचा शोध घेतला. परंतू कुणीही मिळून आले नाही. पोलिसांनी देखील परिसर पिंजून काढला. परंतू कुणीही आढळून आले नाही. दरम्यान, पोलिसात याबाबत एनसी दाखल असल्याचे कळते.