आदित्यला ठाकरेंच्या दौऱ्याने जळगाव ग्रामीण मतदार संघातील समीकरणे बदलणार
Live Maharashtra news– युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर २० रोजी येत असून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव येथे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादीतर्फे आदित्य ठाकरे यांचा दुपारी १ वाजता जाहीर सत्कार करणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत .
गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरुद्ध लढून विजयी व पराभूत झाले आहेत . त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याने यात धरणगाव तालुका हा गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने त्यांना शह देण्यासाठी गुलाबराव देवकर हे पुढे आले असल्याचे राजकीय गोटात म्हटले जात आहे.
शिवसेनेसोबत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी होती . मात्र शिवसेनेतील ४० आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदेसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये शिवसेनेच्या जिल्ह्यातील बंडखोर आमदार गेले असल्याने युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे बंडखोर आमदारांच्या मतदार संघात दौरा करणार असल्याने या दौऱ्याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर असा सामना जळगाव ग्रामीण मतदार संघात पुन्हा पाहायला मिळत असल्याने मतदार संघात घडणाऱ्या या घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलणार आहेत हे निश्चित ! दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे धरणगाव तसेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.