वरणगाव : प्रतिनिधी
येथून जवळच असलेल्या केंद्रशासित युद्ध साहित्य व सामुग्री निर्माण करणाऱ्या कारखान्यातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये किरकोळ कारणांवरून हाणामारी झाली. मात्र एकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या डोक्यात व हातावर टेबलावरील पेपरवेटने जीवघेणा हल्ला केल्याने जखमी अधिकाऱ्याने वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून, संशयितास पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वरणगाव आयुध निर्माणीत येथील केंद्र सरकारच्या युद्ध साहित्य व सामग्री निर्माण कारखान्यात रविवारी (ता. १४) सकाळी अकरादरम्यान फिर्यादी आयुध निर्माणी वरणगावचे जॉइंट जीएम शैलेश रामचंद्र पाटील (वय ५१, रा. रेणुकानगर, वरणगाव) हे आयुध निर्माणीत कर्तव्यावर असताना संशयित अमृत पाल (एजीएम, आयुध निर्माणी वरणगाव) (रा. रेल्वे ऑफिसर कॉलनी, भुसावळ) हे वरिष्ठ अधिकारी शैलेश पाटील यांना न विचारता ड्यूटीवरून घरी निघून गेले होते. त्या संबंधी विचारणा केली असता त्याचा राग आल्याने अमृत पाल यांनी शैलेश पाटील यांच्या केबीनमध्ये येऊन टेबलावरील पेपरवेट हातात घेत शैलेश पाटील यांच्या डोक्यावर सात ते आठ वार करीत तर उजवा हात धरून दोन बोटे देखील फॅक्चर केली आहेत.