
जळगाव : प्रतिनिधी
बांभोरीजवळील गिरणा नदीच्या पुलावरुन जळगावकडे जाणाऱ्या भरधाव ट्रालाने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी (तिघ रा. झुरखेडा, ता. धरणगाव) हे तिघ जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजता बांभोरी पुलाजवळ घडली. याप्रकरणी ट्राला चालक अनुपम गोविन्द प्रजापती (रा. रतनावे, पोस्ट भरौली, ता. बुढनपूर, जि. आजमढ, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
यावल तालुक्यातील वनोली येथे साईबाबा मंदिरावर भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने झुरखेडा येथील सुशिल चौधरी हे त्यांचे नातेवाईक गौरव चौधरी, जगदिश पाटील, विजय चौधरी, गणेश पाटील हे त्यांच्या (एमएच १९, पीई २१९८) क्रमांकाच्या कारने तर पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी हे तिघ (एमएच २८, बीके ४९४३) क्रमांकाच्या कारने गेले होते. वनोली येथे जेवण केल्यानंतर ते झुरखेडा जाण्यासाठी जात असतांना बांभोरी पुलाच्या अलीकडे बांभोरीपुलावरुन जळगावकडे येणाऱ्या (केएन ६३-५७६०) क्रमांकाच्या ट्राला हा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत येत होता. त्याने समोरुन येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील पंकज चौधरी, हरिष चौधरी व रविंद्र चौधरी हे तिघ गंभीर जखमी झाले.
ही घटना त्यांच्या मागे येत असलेल्या सुशिल चौधरी यांच्या लक्षात आली. त्यांनी नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी ट्राला चालक अनुपम गोविन्द प्रजापती (रा. रतनावे, पोस्ट भरौली, ता. बुढनपूर, जि. आजमढ, उत्तरप्रदेश) याच्याविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.



