
अहिल्या नगर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील इमामपूर येथे शेतामध्ये झेंडूच्या पिकाआड गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या शेतावर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २२ लाख २० हजार ७५० रुपये किमतीची ४४.४१५ किलो गांजाची झाडे जप्त केली आहेत.
याप्रकरणी शेतकरी देविदास रंगनाथ टिमकरे (वय ६४, रा. इमामपूर, ता. अहिल्यानगर) याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाला इमामपूर येथील शेतात गांजाची शेती होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली.
जिल्ह्यात तेलंगणा आणि ओरिसा या राज्यांमधून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असताना आता जिल्ह्यातच गांजाची शेती करण्याचा प्रकार वाढला आहे. अकोले तालुक्यातील राजूर, नेवासा, अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात यापूर्वी गांजाची शेती पोलिसांकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. आता आणखी एक कारवाई समोर आली. त्यामुळे परराज्यातील गांजा तस्करीसह जिल्ह्यात गांजाच्या उत्पादनाचा धोका वाढला आहे.



