
जळगाव मिरर | १५ सप्टेंबर २०२६
गणपती उत्सवाच्या पहिल्याच दिवशी जेवणाच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दिघावे गावाच्या हद्दीत घडली. मित्रांमध्ये सुरू झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून चैत्रम दिलीप मालचे (वय ४०) यांच्यावर कुऱ्हाड आणि लाकडी काठीने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चैत्रम मालचे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी साक्री पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत प्रकाश सोनावणे आणि रोहिदास जाधव या दोघांना काही तासांतच ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चैत्रम मालचे हे काही मित्रांसोबत दिघावे गावाच्या हद्दीत एकत्र आले होते. यावेळी सर्वजण जेवण करत असताना जेवणाच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, काही वेळातच वाद वाढत गेला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
या हाणामारीदरम्यान प्रकाश सोनावणे याने कुऱ्हाडीने, तर रोहिदास जाधव याने लाकडी काठीने चैत्रम मालचे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात चैत्रम गंभीर जखमी झाले. त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. गंभीर अवस्थेत ते घटनास्थळीच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून निघून गेले. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांचे पथक तातडीने दिघावे येथे दाखल झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा माग काढला. अखेर प्रकाश सोनावणे आणि रोहिदास जाधव या दोघांना काही तासांतच ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. दोन्ही संशयितांची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम तपासला जात आहे.
किरकोळ वाटणाऱ्या जेवणाच्या वादातून थेट हत्या झाल्याने दिघावे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मृत चैत्रम मालचे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांकडून घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. वाद नेमका कशावरून सुरू झाला, हल्ल्याचे कारण काय होते आणि या घटनेत आणखी कोणी सहभागी होते का, याचा तपास साक्री पोलीस करीत आहेत.



