जळगाव प्रतिनिधी । जळगावात मुलीला भेटण्यासाठी आलेल्या नाशिक येथील वयोवृध्दाला तीन जणांना रिक्षात बसवून मेहरूण तलावाजवळ नेत चाकूचा धाक दाखवत रोकड आणि मोबाइल चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, उत्तमराव नामदेव वाघ (वय-७८) रा. द्वारका, नाशिक हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते रेल्वे विभागात सिनीयर सेक्शन इंजीनीयर या पदावरून सेवानिवृत्त आहेत. त्यांची लहान मुलगी जळगावातील संत गाडगेबाबा चौकात राहत असल्याने त्यांना भेटण्यासाठी उत्तमराव वाघ हे शुक्रवारी २९ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता जळगावात रेल्वेने आले. मुलीच्या घरी जाण्यासाठी ते रिक्षाने बसले. रिक्षात आगोदर दोन जण बसले होते. रिक्षा इच्छादेवी चौक, डी-मार्ट पाईंटवरून संत गाडगेबाबा चौक न जात थेट मेहरूण तलावाजवळील एका गल्लीतील अंधारात घेवून गेला. त्यावेळी तिन जणांनी अचानक उत्तमराव वाघ यांच्या मानेला चाकू लावून खिश्यातील ४ हजाराची रोकड आणि १२ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून पसार झाले. उत्तमराव वाघ यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११ वाजता अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.