नाशिक : प्रतिनिधी
नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणाव उघडपणे समोर येऊ लागला आहे. महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी दाखल करणारे गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नसल्याने शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिंता वाढली आहे. गिते यांच्या भूमिकेमुळे महायुतीसमोर प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला असून, बंडखोरी शमवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अद्याप पूर्ण यश आलेले नाही.
गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे मंत्री उदय सामंत आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये तळ ठोकून बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू ठेवले आहेत. या चर्चांमध्ये मंत्री दादा भूसे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या सलग बैठका आणि चर्चांमुळे काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून आला असून, उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र, गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेण्यास नकार दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादा भूसे यांनी गोकुळ गिते यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना, “आज नक्कीच गुडन्यूज मिळेल. चर्चा सकारात्मक झाली आहे,” असे सांगितले होते. तथापि, बैठकीनंतर कोणताही ठोस निर्णय समोर न आल्याने गिते आपल्या भूमिकेवर कायम असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, गोकुळ गिते यांना निवडणुकीतून माघार घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. याच अनुषंगाने नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे यांनी गणेश गिते यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, गिते यांच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीने एकसंघपणे लढण्याचा निर्धार व्यक्त केला असला, तरी गोकुळ गिते यांच्या बंडखोरीमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काही तासांत गिते यांची भूमिका स्पष्ट होणार असून, महायुतीला दिलासा मिळणार की आणखी एक राजकीय पेच निर्माण होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



