प्रविण पाटील प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. यात म्हसावद बोरनार गटाचे आरक्षण सर्वसाधारण ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या गटात भाजपा, राष्ट्रवादी आणि शिंदे गट याच्यावतीने इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण काढण्यात आले. यात म्हसावद-बोरणार गटासाठी सर्वसामान्य ओबीसी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ओबीसी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या नावाची चर्चा असून त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी होत असतांना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशाल देवकर यांना जिल्हा परिषद सदस्यासाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विशाल देवकर यांनी जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लाढवावी अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने विशाल देवकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील कापडणेकर यांची देखील निवडणूकीत उतरण्याची जोरदार तयारी दिसून येत आहे.