जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार दूध संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दूध संघातील गैरकारभाराच्या तक्रारीवरून एक ५ सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने गुरूवारी २८ जुलै रोजी सकाळी सहकारी संस्थेच्या सहनिबंधक निबंधकांना एक पत्र पाठवत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या मुख्य प्रशासकपदी आ. मंगेश चव्हाण यांची नियुक्ती केल्याचे म्हटले आहे. तसेच पत्रात पुढे म्हटले आहे की, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने मला आपणास असे कळविण्याचे निर्देश आहेत की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाचा ५ वर्षांचा कालावधी तसेच त्यानंतर नियमानुसार मुदतवाढ देण्यात आली आहे.
नविन संचालक मंडळाची निवड करण्यासाठी घ्यावयाच्या निवडणूका ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दूध संघाबाबत बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार समितीमार्फत सदर तक्रारीची चौकशी सुरु आहे. अशा स्थितीत जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची वैधानिक मुदत समाप्त झाली असल्याने सदर संचालक मंडळ बरखास्त करुन नविन प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश आहेत.