चाळीसगाव : प्रतिनिधी
शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियात खोट्या पिस्तुलासह (एअर गन/नकली शस्त्र) फोटो व व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेतन गोल्हार याने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसारित केली होती. यामध्ये त्याने हातात पिस्तूल घेऊन समाजात भीती व दहशत निर्माण होईल असे वर्तन केले होते. ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरल्याने शहरात चर्चेला उधाण आले.
सोशल मीडियावरील या प्रकाराची चाळीसगाव शहर पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली. पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास करत आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी रात्री पोलिसांनी संशयित आरोपी चेतन गोल्हार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले नकली पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. संशयितावर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२ आणि ११७ अन्वये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.



