भुसावळ : प्रतिनिधी
सोशल मीडियावरील बनावट ओळख, परदेशातून पार्सल व डॉलरची लालूच, तसेच एफबीआय, अमेरिकन सैन्य आणि भारतीय कस्टम विभागाची भीती दाखवत भुसावळ एमआयडीसीतील एका कामगाराकडून तब्बल ३ लाख ४७ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एका कंपनी मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले चंदन मुन्ना मौर्य (वय ३४) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दि. ८ जून २०२४ रोजी टेलर नावाच्या फेसबुक पेजवरून मौर्य यांच्याशी संपर्क साधण्यात आला. काही दिवस संवाद साधून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मियामी (अमेरिका) येथून पार्सल पाठवले आहे.
असे सांगून डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैसे मागण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला मौर्य यांनी नकार दिला; मात्र सुडान युद्धात अडकलो आहे, ‘पार्सलमध्ये मोठी डॉलरची रक्कम आहे’, ‘एफबीआय, अमेरिकन पोलिस व भारतीय कस्टम कारवाई होईल” अशा धमक्या व आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. ई-मेल, व्हिडिओ कॉलद्वारे बनावट अधिकारी, मिलिटरी व कस्टम कारवाईचे नाटक रचले.
डिलिव्हरी चार्जेस, कस्टम शुल्क, वकील फी, एफआययू प्रमाणपत्र, वायर कोड, पार्सल देखभाल शुल्क अशा विविध कारणांखाली वेळोवेळी पैसे मागण्यात आले. मौर्य यांनी जून २०२४ ते एप्रिल २०२५ या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण ३,४७,००० रुपये जमा केले. परदेशी व्यक्ती हिंदीत संवाद साधत असल्याचे लक्षात आल्यानंतर मौर्य यांना संशय आला. त्यानंतर आपण फसवणुकीचे बळी ठरलो असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.



