एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील खडके बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. आदिवासी मजूर कुटुंबाला त्यांच्या लहान मुलांसह ऊसतोडणी आणि शेतीची कामे करण्यास भाग पाडले, तसेच डांबून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी ठेकेदार आणि त्याच्या मुलावर एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठेकेदार रंजीत पवार आणि त्याचा मुलगा राजेश पवार (दोन्ही रा. खडके बु, ता. एरंडोल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपानगर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी गोरेलाल रामसिंग बारेला (३०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सप्टेंबर २०२५ पासून संशयितांनी बारेला कुटुंब आणि इतर मजुरांना कामासाठी आणले होते. या दरम्यान त्यांना खडके बुद्रुक आणि भरूच (गुजरात) येथे नेऊन त्यांच्याकडून सक्तीने कामे करून घेण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून या मजूर कुटुंबांना मजुरीचे पैसे देण्यात आले नाहीत. इतकेच नव्हे तर, त्यांच्याकडील मोबाईलही काढून घेण्यात आले.
संशयितांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर बारेला यांनी पोलिसांत फिर्याद दिली. एरंडोल पोलिसात वरील बाप-बेट्यां विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते है करीत आहेत.



