जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील जळके,वसंतवाडी,सुभाषवाडी,वराड,विटनेर परिसरातील भारत गॅस ग्राहकांना जळगाव महाबळ येथील भुषण गॅस एजन्सी कडून गॅस सिलिंडर बुक करुन देखील सिलेंडर लवकर दिले जात नसल्याने भुषण गॅस एजन्सीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या परिसरातील भारत गॅस ग्राहकांनी मागील महिन्यात १७,१८,१९मार्चला आपले सिलिंडर बुक केले असुन त्या ग्राहकांना ३,४ एप्रिल ला सिलिंडर डिलिव्हरी मेसेज प्राप्त झाले असून ग्राहकांना सिलिंडर मिळाले नाहीत तसेच ग्राहकांनी दुरध्वनी वरून विचारणा केल्यावर आज येणार उद्या येणार असेच सांगितले जाते. या संदर्भात भुषण गॅस एजन्सीचे संचालक भुषण चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अजब उत्तर दिले की ग्रामीण भागात पुरवठा करणे शक्य होत नाही मी ग्रामीण भागातील भारत गॅस ग्राहकांचे ट्रान्सफर साई गॅस एजन्सीकडे करत आहे अशा प्रकारे असमाधानकारक उत्तर दिले जात आहे. सणासुदीला भुषण गॅस एजन्सी कडून नियोजनाच्या अभावामुळे गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
तरी जळगाव तालुका पुरवठा निरीक्षक यांनी या संदर्भात चौकशी करून ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांना सिलिंडर पुरवठा सुरळीत करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



