जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील फत्तेपूर येथील घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककला पसरली आहे.
मृत्यू हा अटळ आहे, परंतु ऐन उमेदीच्या वयात एखाद्याचा अकाळी मृत्यू होणे, हा कुटुंबावर मोठा आघात करून जातो; अशीच एक दुर्दैवी घटना १५ एप्रिलला दुपारी ४ वाजेच्या सुमारास फत्तेपूर येथे घडली. सुपियान खान चांद खान पठाण (वय १६) हा युवक घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात गेला असता विजेच्या धक्क्याने तो जागीच कोसळला. दरम्यान, प्रत्यक्षदर्शीने त्याला खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
तेथून जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यास उपचारासाठी हलवण्यात आले. तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. अतिशय आज्ञाधारक, सदैव हसतमुख आणि धार्मिक वृत्तीच्या सुपियानच्या मृत्यूची वार्ता गावात पसरताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते. अतिशय गरीब कुटुंबातील होतकरू मुलाचे अचानक निघून जाणे कुटुंबांसाठी मोठा आघात मानला जात आहे. त्याचे वडिल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, मयत सुपियानची अंत्ययात्रा १६ रोजी सकाळी ९ वाजता फत्तेपूर येथील राहत्या घरापासन निघेल



