नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक येथील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असताना, या वादात आता करुणा मुंडे यांनी उडी घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “महिलांवर जितके अत्याचार अशोक खरातने केले, तसेच अर्धे अत्याचार धनंजय मुंडे यांनी केले,” असा थेट आरोप करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
अशोक खरातने राजकीय आणि प्रशासकीय पाठबळावर मोठे सिंडिकेट उभारून महिलांचे शोषण केल्याचे आरोप समोर येत असतानाच, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ‘कॉल कुंडली’ प्रकरणातून अनेक बड्या नेत्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी या प्रकरणाचा ‘आका’ कोण आहे, याचा शोध घेण्याची मागणी केली आहे.
करुणा मुंडे म्हणाल्या, “अशोक खरातचे अनेक मोठ्या नेत्यांसोबत फोटो आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे समोर आले पाहिजे.” त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. रूपाली चाकणकर यांच्यावरही त्यांनी टीका करत विचारले, “त्यांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? त्यांच्या आर्थिक व्यवहारांची आणि फोन कॉल्सची चौकशी झाली पाहिजे.” चौकशी न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राजकारण होत असल्याचा आरोप करत करुणा मुंडे म्हणाल्या की, “हे पद एखाद्या निवृत्त न्यायाधीशाला दिले पाहिजे, अन्यथा महिलांना न्याय मिळणार नाही.” त्यांनी या नियुक्तीत राजकीय हस्तक्षेप टाळण्याची मागणी केली. या प्रकरणात पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांचे अशोक खरातशी संबंध काय होते, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.
करुणा मुंडे यांनी गंभीर इशारा देताना म्हटले की, “या प्रकरणात अनेक मोठे लोक अडकू शकतात. त्यामुळे अमेरिकेतील जेफ्री एपिस्टन प्रकरणाप्रमाणे अशोक खरातच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.” त्यामुळे त्याच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घेण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरू असून, रोज नव्या घडामोडी समोर येत असल्याने राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



