जळगाव ; प्रतिनिधी
पैसे काढण्यासाठी एटीएम सेंटरमध्ये गेलेल्या देविदास रामा कोळी (६१, रा. रायपूर, ता. जळगाव) यांचे एटीएम कार्ड बदलून त्यांच्या बँक खात्यातून वेळोवेळी २ लाख ३१ हजार ३६९ रुपये परस्पर काढून घेण्यात आले. ही घटना २६ ते ३० मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जलसंपदा विभागातून सेवानिवृत्त झालेले देविदास कोळी हे २६ मार्च रोजी राजकमल टॉकीज परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएममधून २० हजार रुपये काढले. त्यावेळी त्यांच्या मागे हेल्मेट घातलेल्या एक जणाने त्यांना थांबविले व ‘बाबा तुमचे एटीएम कार्ड दाखवा’, असे म्हणत एटीएम कार्ड घेऊन बदलले.
३० मार्च रोजी देविदास कोळी हे बँकेत ५० हजार रुपये काढण्यासाठी गेले असता, त्यांना बँकेतील कर्मचाऱ्यांनी तुमच्या खात्यात एवढी रक्कम शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यांनी स्टेटमेंट पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून २६ ते ३० मार्च दरम्यान वेगवेगळ्या एटीएममधून अज्ञात व्यक्त्तीने वेळोवेळी २ लाख ३१ हजार ३९६ रुपये काढल्याचे समजले. त्यांनी त्यांच्याजवळील एटीएम कार्ड बघितले असता, त्यावर अनुपकुमार श्रीवास्तव असे नाव होते. याप्रकरणी कोळी यांनी १३ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिसा फिर्याद दिल्यावरुन अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास उपनिरीक्षक उल्हास चन्हाटे करीत आहेत.



