जळगाव : प्रतिनिधी
धावत्या रेल्वेसमोर झोकून देत वासुदेव विठ्ठल बारी (वय ४४, रा. शिरसोली प्र.न., ता. जळगाव) या मेडीकल व्यावसायीकाने आत्महत्या केली. ही घटना दि. २९ मार्च रोजी रात्री जळगाव ते भादली दरम्यान आसोदा रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे राहणारे वासुदेव बारी यांचे जळगाव व शिरसोली येथे मेडीकल आहे. दि. २९ रोजी घरातून बाहेर गेले होते. त्यानंतर जळगाव ते भादली रेल्वे मार्गावर अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२२/१८नजीक त्यांनी भुसावळ-सुरत रेल्वे समोर स्वतःला झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. या विषयी रेल्वेचालक चंदन पवार यांनी जळगाव स्थानक प्रमुखांना याविषयी कळविले. त्यांनी यासंदर्भात शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोहेकॉ शशिकांत पाटील हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरुवातीला अनोळखीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांना मयताच्या खिशात आधारकार्ड, पॅनकार्ड सापडले. त्यावरून ओळख पटविण्यात आली. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.



