धरणगाव : प्रतिनिधी
खासगी कामानिमित्त एरंडोलकडे जाताना धरणगावातील तरुणाच्या कारला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात कार उलटून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना ३० मार्चला दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास बोरगावनजीक घडली.अविनाश संजय चौधरी (वय ३५) असे मयत तरुणाचे नाव असून, ते धरणगावच्या माजी उपनगराध्यक्षा प्रतिभा चौधरी तसेच येथील श्री इलेक्ट्रॉनिकचे संचालक तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय वामन चौधरी यांचे चिरंजीव होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश चौधरी हे रुग्णवाहिका चालक होते. सोमवारी दुपारी ते आपल्या स्विफ्ट डिझायर कार (एमएच-४६, एक्स- २६३६) ने वैयक्तिक कामासाठी बोरगाव मार्गे एरंडोलकडे जात होते. बोरगावजवळून जात असताना समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जबर धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की, अविनाश यांची कार रस्त्यावरच उलटली. या अपघातात अविनाश यांच्या छातीला आणि डोक्याला गंभीर इजा झाली अन् त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या घटनेमुळे धरणगाव शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे. यानंतर त्यांचा मृतदेह जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला होता. तेथे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. दरम्यान, अविनाश यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि २ भाऊ असा परिवार आहे. एका उमद्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर रात्री ८ वाजता त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. दरम्यान, अविनाश चौधरी यांनी कोरोना काळात अनेकांचे जीव वाचवले होते. त्यामुळे त्यांना शासनातर्फे कोरोना योद्धा म्हणून गौरवण्यात आले होते.



