मुंबई : वृत्तसंस्था
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात चर्चा व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. परंतु, अद्याप या मुद्यावर विधानसभेत चर्चा करण्यास परवानगी मिळालेली नाही, अशी माहिती रोहित पवारांनी दिली आहे.
रोहित पवार म्हणाले की, सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ११ वेळा राज्याचे बजेट मांडलेले अजितदादा अकाली मृत्यू पावले तरी या गंभीर प्रकरणावर साधी चर्चाही विधिमंडळात होत नसल्याचे दुर्दैवी आहे. त्यामुळे त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेत अजित पवारांच्या विमान अपघाताचा विषय चर्चेला घेण्याची विनंती केली असून निवेदनही दिले आहे. रोहित पवारांच्या मते, अजितदादांचे योगदान आणि त्यांच्या विमान अपघातासंदर्भातील संशयास्पद बाबी लक्षात घेता, चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे.
माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी इशारा दिला, “अपघाताशी संबंधित मोठी माहिती माझ्याकडे आहे. सरकार काय पाऊल उचलते ते बघू नाहीतर ती माहिती सार्वजनिक करणार आहोत.” त्यांनी सरकारवरही सवाल उपस्थित केला की, “अजितदादांच्या सोबत सत्तेत असताना, आपण आपल्या माणसाला न्याय देऊ शकत नाही, तर इतरांना काय न्याय द्याल?”
रोहित पवार पुढे म्हणाले की, शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी हे देखील अजित पवारांच्या विमान अपघातावरील चर्चेला प्रोत्साहन देत आहेत, पण चर्चा होऊ दिली जात नाही. तसेच, VSR कंपनीला वाचवले जात असल्याचा संशय असून, यामागे मोठा माणूस असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. रोहित पवारांच्या या इशार्यानंतर सरकार आणि विधानसभेत यावर चर्चा होणार की नाही, हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल.



