मुंबई : वृत्तसंस्था
अंधेरी परिसरात विदेशी महिलांना हाताशी धरून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ए. के. रोडवरील हॉटेल व्हिला पॅलेस येथे छापा टाकून पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह चार जणांना अटक केली असून दोन विदेशी महिलांची सुटका केली आहे.
सहार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये काही विदेशी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून भारतात बोलावले जात होते आणि त्यानंतर त्यांना जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती समोर आली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहकाने आरोपींशी संपर्क साधून विदेशी महिलांची मागणी केली. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोगस ग्राहक हॉटेलमध्ये पोहोचला असता, तेथील कर्मचाऱ्यांनी त्याची दोन युगांडा देशातील महिलांशी ओळख करून दिली. पैशांचा व्यवहार सुरू होताच पोलिसांनी छापा टाकत संपूर्ण रॅकेटचा भांडाफोड केला.
या कारवाईत हॉटेल मॅनेजर विवेककुमार वैद्यनाथ यादव, हाऊसकीपिंग कर्मचारी अनिलकुमार जोकू पुष्पाकर, धीरज मधुकर जांबळे आणि महेश राजपाल राजवरिया यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली. प्राथमिक तपासात हॉटेलचा मालक अक्षय दिलीप शेटे आणि ‘जास्मिन’ नावाची केनियन नागरिक महिला हे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दोघांना या प्रकरणात फरार आरोपी घोषित करण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे.
छाप्यात पोलिसांनी दोन विदेशी महिलांची सुटका केली असून त्यांना वैद्यकीय तपासणीनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणात आणखी किती महिलांना अडकविण्यात आले आहे आणि रॅकेटचे जाळे किती मोठे आहे, याचा तपास सहार पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे अंधेरी परिसरात खळबळ उडाली आहे.



