मुंबई : वृत्तसंस्था
चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीत प्रशिक्षणासाठी गेलेला जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) येथील जय नरेंद्र पाटील (वय २१) हा तरुण शनिवारी समुद्राच्या प्रचंड लाटेत वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत जयसह आणखी दोन जण बेपत्ता असून प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, घटनेला २४ तास उलटूनही जयचा ठावठिकाणा लागलेला नाही.
चेन्नईतील कॉग्निझन्ट या माहिती तंत्रज्ञान कंपनीत महाराष्ट्रातील १५ युवक-युवतींची प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलेला जय पाटील ५ फेब्रुवारी रोजी कंपनीत रुजू झाला होता. शनिवारी सुट्टी असल्याने तो काही सहकाऱ्यांसोबत चेन्नईतील गोल्डन बीच येथे फिरण्यासाठी गेला होता. समुद्रकिनारी छायाचित्रे काढत असताना अचानक मोठ्या लाटा उसळल्या आणि त्यात जयसह तीन जण ओढले गेले. उपस्थितांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिक प्रशासन आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र अद्याप तिघांचाही शोध लागलेला नाही.
दुर्घटनेच्या काही तासांपूर्वी जयने घरी दूरध्वनी करून ‘आज सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला जात आहे,’ अशी माहिती दिली होती. त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. सायंकाळी चेन्नई पोलिसांनी जयच्या वडिलांना घटनेची माहिती दिली. जयचे वडील नरेंद्र पाटील हे शेतकरी असून आई शिक्षिका आहे. त्याची बहीण सध्या बारावीची परीक्षा देत आहे. घरातील वातावरण आधीच तणावपूर्ण असल्याने आईला धक्का बसू नये आणि बहिणीच्या परीक्षेवर परिणाम होऊ नये, यासाठी कुटुंबीयांनी ही बातमी सावधपणे हाताळली आहे. जयचे काही नातेवाईक तातडीने चेन्नईकडे रवाना झाले आहेत.
स्थानिक पोलीस आणि बचाव पथकाकडून समुद्रात शोधकार्य सुरू असून नौकांच्या साहाय्याने परिसराची तपासणी केली जात आहे. भरती-ओहोटी आणि वेगवान प्रवाहामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पाळधी गावावर शोककळा पसरली असून जयच्या सुरक्षिततेसाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे.



