पालकमंत्र्यांचे तात्काळ पंचनाम्याचे आदेश; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची केली पाहणी
जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून नियमानुसार मदत दिली जाईल. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहे. प्रत्येक पात्र शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना सांगितले.
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी आज धरणगाव तालुक्यातील बोरगाव बुद्रुक, गारखेडा, पष्टाने बुद्रुक तसेच जळगाव तालुक्यातील करंज, धानोरा व धार्डी या गावांमधील नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान संबंधित गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांनी आपली नावे तलाठी कार्यालयात नोंदवावीत. त्यानंतर संबंधित ठिकाणी पंचनामे करण्यात येऊन त्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देवून अनेक भागांमध्ये विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला असून, तुटलेल्या वीज तारा व खांबांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश महावितरण अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या व निवेदने पालकमंत्र्यांकडे सादर केली. पाहणी दौऱ्यादरम्यान पालकमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या दौऱ्यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, गटविकास अधिकारी किशोर वानखेडे, तहसीलदार शितल राजपूत, नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, मंडळ अधिकारी आशिष वाघ, ज्योती चौधरी, तालुका कृषी अधिकारी के. एच.देसले, तलाठी जीवनकुमार खोकले, ज्योती लोखंडे तसेच संबंधित गावांचे सरपंच , लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



