मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक क्षण घडला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून त्यांची अधिकृत निवड करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
सुनेत्रा पवार यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्ष व विधानपरिषदेतील सदस्यांची संयुक्त बैठक विधानभवनात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, ज्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभेतील खासदारपदाचा राजीनामा दिला. २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या निधनानंतर राज्यभर शोककळा पसरली होती. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला असून, त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.



