मुंबई : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात होऊन त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. गुरुवारी शोकाकुल वातावरणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर आता राज्याच्या राजकारणात नवा उपमुख्यमंत्री कोण असणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर सुनेत्रा पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग आला असून, राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबत एकमुखी निर्णय घेण्यासाठी ही महत्त्वाची बैठक होणार असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आज मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाले असून, या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादीकडे असलेले उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून सर्व आमदारांची बैठक घेऊन उपमुख्यमंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्यासह दोन ते तीन नावांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून, पक्षाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार, आणि राष्ट्रवादीकडून नवा उपमुख्यमंत्री कोण असणार, हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.



