बारामती : वृत्तसंस्था
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला. अंत्यविधीच्या वेळी उपस्थित हजारो समर्थक, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते. पत्नी सुनेत्रा पवार यांनी पतीच्या पार्थिवावर गंगाजल अर्पण करून अंतिम निरोप दिला.
या अंत्यसंस्काराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रासह इतर राज्यांतील नागरिकही मोठ्या संख्येने बारामतीत दाखल झाले होते. मंगळवारी रात्रीपासूनच शहरात गर्दी वाढू लागली होती. सकाळी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. समर्थक दुचाकी, ट्रॅक्टर-ट्रॉली आणि बसेसमधून आले होते. सुमारे एक ते दोन किलोमीटरपर्यंत अंत्ययात्रा पसरली होती. महाराष्ट्र पोलिस दलातर्फे हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून अजित पवार यांना अखेरची मानवंदना देण्यात आली.
बुधवारी सकाळी 8.46 वाजता बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार (वय 66 वर्षे 6 महिने 6 दिवस) यांचे निधन झाले होते. या अपघातात वैमानिक सुमीत कपूर, सहवैमानिक शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी यादव यांचाही मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकही जण वाचू शकला नाही.
दरम्यान, अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारे वक्तव्य समोर आले आहे. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या प्रश्नावर थेट भूमिका मांडत सुनेत्रा पवार यांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या हालचालींना वेग आला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या भेटीचा नेमका तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
अंत्यसंस्कारावेळी पार्थ पवार आणि जय पवार हेच प्रमुखपणे पुढे उभे राहून मान्यवरांच्या भेटी घेत असल्याचे चित्र दिसले. पवार कुटुंबातील आणि पक्षातील वरिष्ठ नेते खाली बसून होते. त्यामुळे अजित पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून पार्थ आणि जय पवार पुढे येणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बारामतीचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेतृत्व होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे पक्ष आणि सरकारमधील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या रिक्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नेतृत्वाची धुरा कोणाकडे जाणार, उपमुख्यमंत्रीपदासाठी कोणता चेहरा पुढे येणार आणि सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार यांच्या पश्चात निर्माण झालेली पोकळी भरून काढणे हेच आता राष्ट्रवादी काँग्रेससमोरील सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.



