अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील अंबारे येथील शेतकरी विलास आप्पा पाटील (वय ५२) यांनी स्वतःच्या राहत्या घरी छताला दोरी बांधून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. २७ जानेवारी रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विलास पाटील हे अमळनेर शहरातील सुंदरनगर भागात वास्तव्यास होते. त्यांची मूळ गावी अंबारे येथे सुमारे सहा बिघे शेती असून, तेथे शेती साहित्य ठेवण्यासाठी घर आहे. दि. २७ रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान त्यांनी सुंदरनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घरातून मोबाईल फोनची रिंग वाजत असल्याचा आवाज येत होता; मात्र कोणीही फोन उचलत नसल्याने संशय आल्यावर गावातील काही नागरिकांनी घरात डोकावून पाहिले. दरवाजा उघडताच विलास पाटील यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. विलास पाटील यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, विलास पाटील यांच्यावर सेंट्रल बँकेचे सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज असल्याची माहिती असून, कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.



