जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून साकरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने किंवा संशयिताने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला पोलिसांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले असताना, ग्रामस्थांनी त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून देण्याचा प्रयत्न केला. आरोपीला तात्काळ ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. यावेळी काही ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मात्र मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांकडून झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली असून, हत्या नेमकी का आणि कशा पद्धतीने करण्यात आली याबाबत अधिक तपशील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे साकरी गावासह परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.



