जळगाव : प्रतिनिधी
शहरातील ओम नगर परिसरातील एका तरुणाला बनावट ‘एसबीआय योनो’ लोगो असलेल्या फाईलद्वारे ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांना गंडविण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय धर्मराज चव्हाण (३५, रा. ओम नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि.१७ जानेवारी २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने ‘आधार केवायसी अपडेट’ नावाने एक संशयास्पद फाईल पाठवली होती. ही फाईल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने विजय यांच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून खात्यातील शिल्लक रक्कमच चोरली नाही, तर त्या खात्याशी संबंधित असलेली एफडीदेखील परस्पर मोडून सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. एकूण ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय चव्हाण यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले.



