सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला अपेक्षित यश मिळाल्यानंतर आता काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरल्याने सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहीत “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं… पर सिर्फ अगली छलांग लगाने” असे विधान केले होते. या वक्तव्यावर टीका करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी “दो कदम पीछे नहीं हटे… ५० कदम नीचे गिरे हैं, वह भी टांग ऊपर” अशा आक्षेपार्ह शब्दांत प्रत्युत्तर दिले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर भाजप–काँग्रेसमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार” असा नारा देत भाजपकडून निवडणूक तयारीला वेग आला आहे.
जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असून, भाजपकडूनही संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. बैठका, रणनीती आखणे आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यावर भाजपचा भर असल्याचे दिसून येत आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही यश मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असून, त्यासाठी राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालल्याचे स्पष्ट चित्र आहे.



