एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील कासोदा येथे नुकताच पदभार स्विकारल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील हे अलर्टमोडवर काम करीत आहे. त्यांच्या पथकाने आडगाव येथे तलवार घेवून फिरणाऱ्या विशाल सुभाष महाजन (वय २२, रा. नागोबा मढी, ता. एरंडोल) याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली.
कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आडगाव येथे तरुण तलवार घेवून दहशत माजवित असल्याची माहिती प्रभारी सपोनि श्रीकांत पाटील यांना मिळाली. त्यांनी लागलीच पो. हे. कॉ. नंदलाल परदेशी, नितीन सुर्यवंशी, योगेश पाटील यांच्या पथकाला रवाना केले. मात्र तो संशयित पसार झाला होता. दरम्यान, दि. २९ रोजी पोलिसांची गस्त सुरु असतांना संशयित विशाल महाजन हा गावात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपासचक्रे फिरवित संशयिताला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने तलवार ही त्याचे पाहुणे योगेश गुलाब महाजन यांच्या घरी कोणीही नसतांना त्यांच्या लाकडी कॉटमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार ती तलवार पोलिसांनी हस्तगत केली आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



