बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण गंभीर झाले. त्यात एक सहा वर्षीय बालिकेचा पाय निकामी झाला, तर दुसऱ्या अपघातात साठ वर्षीय महिलेला गंभीर दुखापत झाली आहे.
२५ रोजी रात्रीच्या सुमारास पाऊस सुरू होता. यावेळी बोदवडहून दुचाकीने साळशिंगीकडे जाताना पुढे चालणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने दुचाकी व डम्परमध्ये धडक झाली. त्यात मामाच्या घरी भाऊबीजेनिमित्त आलेली मृणाली गोकुळ हिवाळे (वय ६, रा. मोहाडी, जळगाव) या बालिकेच्या डाव्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर सोबतचे दोन जण जखमी झाले.
दुसऱ्या घटनेत २६ रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान जामनेरहून मुक्ताईनगरकडे जाणारी चारचाकी बोदवडच्या बरडीया शाळेसमोर उलटली. त्यात कमलबाई जीवनगीर गोसावी (वय ६०, रा. मुक्ताईनगर) तसेच संजीव जीवनगीर गोसावी (वय ५०) हे दोघे गंभीर झाले. त्यांच्यावर बोदवड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुक्ताईनगरला हलविण्यात आले आहे.


