विजय पाटील : प्रतिनिधी
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे माजी आमदार राजीवदादा देशमुख यांचे आज, मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. दुपारी ही दुःखद घटना समोर येताच संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी आमदार राजीव देशमुख यांची आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने चाळीसगाव सर्वात आधी डॉ.मंगेश वाडेकर यांच्या शैलजा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेले तिथून त्यांना धुळे येथे रेफर करण्यात आले. यावेळी चाळीसगावचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण हे त्यांच्या सोबत असल्याचे कळते. प्रकृतीची अधिक गंभीरता लक्षात घेऊन, व तिथूनच चाळीसगाव येथून आ. मंगेश चव्हाण डॉ. नरेंद्र राजपूत, डॉ,सुनील राजपूत यांनी त्यांना धुळे येथील सेवा हॉस्पिटल शिफ्ट केले.
धुळे येथील हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिजित मोरे, डॉ. प्रांजल पाटील, डॉ. यतीन वाघ आणि डॉ. प्रशांत पाटील यांच्या पथकाने देशमुख यांच्यावर शर्थीचे उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. माजी आमदारांच्या निधनाची वार्ता कळताच चाळीसगावसह उत्तर महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांचे पार्थिव चाळीसगाव येथे आणले जात असून, त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे.
राजीव देशमुख यांचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला. ते २००९ ते २०१४ या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून चाळीसगावचे आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षात एकनिष्ठ राहणे पसंत केले होते. त्यांच्या निधनाने चाळीसगाव मतदारसंघातील एक प्रभावी आणि निष्ठावान नेतृत्व हरपले असल्याची भावना व्यक्त होत आहे.


