मुंबई : वृत्तसंस्था
कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सहकारी सोसायटीत रात्री लागलेल्या भीषण आगीत आई-मुलगी जिवंत होरपळून मरण पावल्या. सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कामोठे येथील सेक्टर 36 मधील आंबे श्रद्धा सोसायटीच्या रूम क्रमांक 301 मध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली. सुरुवातीला काही वेळातच ही आग संपूर्ण घरात पसरली. स्थानिकांनी धूर आणि ज्वाळा पाहताच तात्काळ बाहेर धाव घेतली आणि अग्निशमन दलाला फोन केला. तोपर्यंत सोसायटीतील इतर नागरिकांनी इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि जवानांनी इमारतीच्या वर चढून पाण्याचा मारा सुरू केला. ही आग दुसऱ्या मजल्यावरील घरात लागल्याने नियंत्रण मिळवणे कठीण ठरत होते. आग विझवण्यासाठी जवळपास एक तासाहून अधिक काळ शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या प्राथमिक तपासानुसार, घरातील दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. या स्फोटामुळे दुसऱ्या मजल्यावरील संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. आग इतक्या वेगाने पसरली की, काही क्षणांतच घर धुराने आणि ज्वाळांनी वेढले गेले. घरात त्या वेळी तीन सदस्य होते. त्यापैकी दोघांनी तात्काळ बाहेर पडून आपले प्राण वाचवले, मात्र आई आणि मुलगी आतमध्ये अडकल्या. अग्निशमन दलाने जीव धोक्यात घालून त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण धूर आणि उष्णतेमुळे आत प्रवेश करणे अवघड ठरत होते. शेवटी आग आटोक्यात आल्यानंतर दोघींचा होरपळलेला मृतदेह मिळाला.
ही दुर्घटना घडली त्या वेळी परिसरात दिवाळी सणाचा उत्साह होता. घराघरांत दिवे, फटाके आणि आनंदाचे वातावरण होते. परंतु अचानक झालेल्या या भीषण घटनेने कामोठे परिसरात शोककळा पसरली. नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी भीती आणि हळहळ स्पष्ट दिसत होती. स्थानिकांनी सांगितले की, आग लागल्याचे लक्षात येताच आम्ही धावत बाहेर आलो. काही क्षणातच संपूर्ण मजला धुराने भरला होता. अग्निशमन दल आले नसते, तर कदाचित संपूर्ण इमारत जळाली असती.


