जळगाव : प्रतिनिधी
धनत्रयोदशीला सोने चांदीच्या भावात घसरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी (१९ ऑक्टोबर) भाव स्थिर राहिले. आगामी काळात चांदीचे भाव एक लाख ६० ते एक लाख ७० हजार रुपयांदरम्यान राहू शकतात. मात्र सोन्याच्या भावात तेजी राहणार असल्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. दरम्यान, चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे.
अनेक दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत आहे. त्यात धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी सोन्याच्या भावात तीन हजार ३०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३१ हजार ५०० रुपयांवर पोहोचले होते. मात्र ऐन मुहूर्तावर सोन्याच्या भावात तीन हजार रुपयांची घसरण होऊन ते एक लाख २८ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. चांदीच्या भावातही सात हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख ७१ हजार रुपये प्रति किलोवर आली होती. रविवारी हे भाव स्थिर राहिले
धनत्रयोदशी झाल्यानंतर आता खरेदीसाठी दिवाळी पाडव्याचा मुहूर्त आहे. त्यानंतर मात्र सण-उत्सवाची खरेदी फारशी राहणार नाही. त्यात जगभरात स्थिती सावरत आहे. याचाच परिणाम म्हणजे चांदीसाठीचा २५ हजार रुपयांवर पोहोचलेला प्रीमियम आता शून्यावर आला आहे. त्यामुळे चांदीत मोठी वाढ होण्याची शक्यता कमीच असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चांदीचे भाव एक लाख ६० ते एक लाख ७० हजार रुपयांदरम्यान राहू शकतात.


