मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकरी व विरोधक गेल्या काही दिवसापासून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र, नियमात तशी तरतूद नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्यात येणार असल्याची महत्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात आतापर्तंच्या अतिवृष्टीने ६० लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. आँगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी २ हजार २१५ कोटींच्या निधी वितरणला यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या मदतीसाठीची ईकेवायसीची अट शिथिल करून अँग्रीस्टॅकच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय केला आहे.
त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होईल. त्यानंतर पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असल्याने प्रशासनाला नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ दिला आहे. तीन चार दिवसात ही सर्व माहिती जमा होईल. त्यानंतर शेतपिकांचे नुकसान, जमीन खरडून गेल्याने झालेल नुकसान, घरांचे किंवा विहिरींचे नुकसान अशा सर्व प्रकारच्या नुकसानीच्या मदतीचा निर्णय केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, अतिवृष्टीने ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले त्याची भरपाई देण्यासाठीचे सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नुकसानीची सर्व आकडेवारी जमा होताच मदतीच्या सर्वंकष धोरणाचा निर्णय केल्या जाईल. पुढील आठवड्याच्या आत हा निर्णय करून मदतीची घोषणा केली जाईल. तसेच, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


