भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ धावत्या रेल्वेत चोरी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मध्य रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिस यांनी शनिवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. भुसावळ स्थानकाच्या दक्षिण भागातील मुसाफिरखान्यातून देवास आणि नाशिक येथील संशयितांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (७१, रा.नेपानगर), लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (५९), रवी लक्ष्मीनारायण बागरी (२५, दोन्ही रा.उज्जैन), विनोद राधेश्याम बागरी (३५), महेंद्र देवकरण यादव (२२, दोन्ही रा.देवास) आणि राजू निंबा खैरनार (६०, रा. नाशिक) यांचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नेपानगर आणि उज्जैन येथील संशयितांनी हावडा सीएसएमटी मेल एक्स्प्रेसच्या एसी कोचमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे. विशेष म्हणजे शंकर शर्मा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. विनोद आणि महेंद्र यांनी २३ एप्रिल रोजी ट्रेन क्र. ११०५७ च्या बी ३ कोचमधून १५ हजार रुपयांची बॅग चोरी केल्याची कबुली दिली आहे. तिसऱ्या संशयितावर चॅप्टर केस दाखल आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे ए.एस.आय शिवानंद गीते यांच्या नेतृत्वाखालील हेकॉ. महेंद्र कुशवाहा, जोगेंद्र नेरपगार, कॉ. बाबू मिर्झा, लोहमार्गचे हेकॉ. विशाल चौधरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.