भुसावळ : प्रतिनिधी
सोशल मीडियावर कमी किमतीत इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीच्या बहाण्याने हरयाणातील डॉक्टरची १७ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी निखिल सुनीलकुमार मनवानी (२५, रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) याला फरिदाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, फरिदाबाद (हरयाणा) येथील डॉ. श्रीमंत गुईन हे सोशल मीडियावर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी शोध घेत होते. त्यात त्यांचा भुसावळ येथील एका विक्रेत्याशी संपर्क साधला. मनीष शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. डॉ. गुईन यांना वस्तू देण्याच्या नावाखाली चार वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगण्यात आले. या खात्यांमध्ये त्यांनी १७ लाख १० हजार १८० रुपये जमा केले. मात्र, त्यानंतर कोणतीही वस्तू न देता टाळाटाळ करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच १० डिसेंबर २०२४ रोजी फरिदाबाद सायबर क्राईम सेंट्रल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर फरिदाबाद पोलिसांचे पथक भुसावळात धडकले. त्यांनी भुसावळ पोलिसांच्या मदतीने संशयित निखिल मनवानी याला अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी फरिदाबाद येथे नेण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक निरीक्षक उधम सिंग करत आहेत. निखिल याच्याविरुद्ध झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा विविध राज्यांमधून देखील फसवणुकीच्या तक्रारी असल्याची माहिती मिळाली.