जळगाव : प्रतिनिधी
तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर जळगाव पोलिसांच्या मदतीने जेरबंद झाला आहे. अझहर निजाम खाटीक (रा. मेहरुण) असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपीच्या शोधासाठी सायबराबाद पोलिसांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यांनी जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आरोपीबाबत माहिती दिली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीची विनंती केली.
पोलिस अधीक्षकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना सूचना देऊन मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबराबाद पोलिसांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस फौजदार विजयसिंग पाटील व पोलिस हवालदार अक्रम शेख यांनी गुप्त माहितीच्या आधारे पथकाने मेहरुण परिसरात सापळा रचला. १६ मे रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता पाठलाग करून पोलिसांनी संशयित आरोपी अझहर निजाम खाटीकला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला सायबराबाद पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.