भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील कुन्हे पानाचे गावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच संदीप वसंत पाटील (४०) या ट्रक चालकाचा मृतदेह घरात आढळला. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीपची पत्नी माहेरी निघून गेल्याने सध्या तो एकटाच राहत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे घर बंद होते. याबाबत संदीप पाटील याचे काका एकनाथ पाटील यांनी भुसावळ तालुका पोलिसात माहिती दिली. शुक्रवारी बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने एकनाथ पाटील व त्यांचा मुलगा गजानन पाटील यांनी जावून पाहिल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. संदीपच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मृतदेह भुसावळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. तालुका पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.