भुसावळ : प्रतिनिधी
कामायनी एक्स्प्रेसला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याची माहिती भोपाळ रेल्वे पोलिस प्रशासनाने दुपारी १२:४८ वाजता प्रसारित केली. दरम्यान, खंडवा स्थानकावर कामायनी एक्स्प्रेसला पोहोचताच तत्काळ खबरदारी घेत, सुरक्षा यंत्रणांनी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर तासभर कसून तपासणी केली.
सविस्तर वृत्त असे कि, यादरम्यान, आरपीएफ, जीआरपी, सिव्हिल पोलिस, डॉग स्क्वॉड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामायनी एक्स्प्रेसच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. आयपीएफ खांडवा स्वतः घटनास्थळी तपासणीसाठी उपस्थित होते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्लॅटफॉर्म परिसर पूर्णपणे बंद करून आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या. श्वान पथक आणि पोलिस पथकाने कसून तपासणी केल्यानंतर, कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. खात्री झाल्यानंतर ही गाडी सुरक्षित असल्याची घोषित करण्यात आली. धमकी देणाऱ्या कॉल्सचा सोर्स मोबाइल नंबर ट्रॅक करण्यात आला आहे. यानंतर १:५३ वाजता खंडवा स्थानकावरून ट्रेन सुरक्षितपणे रवाना झाली.