भुसावळ : प्रतिनिधी
परतवाडा पोलिस स्टेशन येथे ७ एप्रिल २०२५ रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी मझर अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. फिर्यादी महिलेच्या गळ्यातील १ लाख १७ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून मोटारसायकलवरून त्याने पलायन केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पतीसोबत मंदिरात जात असताना दोन अनोळखी इसमांनी अचानकपणे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासाअंती, ५ मे रोजी परतवाडा (जि. अमरावती) येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आले असता, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. विजय नेरकर, पो. कॉ. प्रशांत परदेशी, योगेश माळी, जावेद शहा, अमर आढळे, सचिन चौधरी आणि भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मार अब्बास जाफर ईरानी याला मुस्लिम कॉलनी, भुसावळ येथून ताब्यात घेतले. या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल ५ एप्रिल २०२५ रोजी मुक्ताईनगर येथून चोरीस गेलेली असून, या वाहनाबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.