भुसावळ : प्रतिनिधी
प्लंबर परवाना नूतनीकरणासाठी सहाशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंत्यासह दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. बुधवारी सायंकाळी नगरपालिकेच्या कार्यालय परिसरात ही कारवाई केली. पाणीपुरवठा अभियंता सतीश सुरेश देशमुख, लिपिक शांताराम उखई सुरवाडे (वय ५७) व शाम समाधान साबळे (२८) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे ४६ वर्षीय प्लंबर आहेत. त्यांचे प्रत्येक वर्षाला परवाना नूतनीकरण करावे लागते. त्यासाठी पाणीपुरवठा विभागात गेल्यानंतर शाम साबळे यांनी बुधवारी सातशे रुपयांची लाच मागितली व साबळे यांनी पाणीपुरवठा अभियंता देशमुख यांना फोन केल्यानंतर त्यांनी सहाशे रुपये लागतील, असे सांगितले. एसीबीकडे तक्रार केली. सुरुवातीला लिपिक शांताराम सुरवाडे यांनी सहाशे रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्यानंतर त्यांनाही अटक केली. आरोपींविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी शाम यांच्याकडील मोबाइल तसेच अभियंता देशमुखकडील मोबाइल व दोन हजार रुपये तसेच सुरवाडे यांच्याकडील एक हजार व मोबाइल जप्त करण्यात आला. आरोपी देशमुखच्या घराची झडती घेण्यात आली.