लोणावळा ; वृत्तसंस्था
राज्यातील पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी एका भरधाव ट्रकचालकाने समोर जाणार्या एका कारला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये ही कार समोरून येणार्या दुसर्या कारवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये पुण्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत.
रविवारी (दि. 20) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणी सागर पांडुरंग इंगुळकर (रा. पुणे) यांनी लोणावळा शहर पोलिस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने भरधाव समोर जाणार्या इनोव्हा कार पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे इनोव्हा समोरून येणारी एर्टिगा कार जाऊन धडकल्याने हा अपघात झाला.
यामध्ये प्रिया सागर इंगुळकर (रा. शुक्रवार पेठ, पुणे), निलेश संजय लगड (42), श्राव्या नीलेश लगड (12, दोन्ही रा. सदाशिव पेठ, पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, एर्टिगा कारमधील शरयू, रूद्राक्ष, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष लगड, आरसित लगड हे किरकोळ जखमी झाले आहेत. तर, इनोव्हा कारमधील प्रवासी अश्विनी रमेष जाडकर (43), ओमकेश रमेश जाडकर (22), सुमित तुकाराम कदम (24), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (25), जिग्नेश रमेश जाडकर (12), संजय नामदेव वाल्हेकर (42), विमल नामदेव वाल्हेकर (69, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. घटनेचा तपास लोणावळा शहर पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड करत आहेत.