भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवरील वाल्मीक नगर भागात काल रात्री उशिरा दोन गटांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर दगडफेकीत झाले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी निखिल धामणे, गोपी धामणे, कालू जाधव, आकाश रायसिंग पंडित या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १९४(२), १२५ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर परिसरात गोळीबार झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, पोलिसांनी स्पष्ट केले की, गोळीबार झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. बंदुकीची रिकामी पुंगळी मिळाल्याची बाब खरी असली तरी ती खोटा पुरावा ठरविण्यात आली आहे. या घटनेनंतर भुसावळ शहरातील वाल्मीकनगरसह काही भागात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
वाल्मीक नगर परिसरात तणावग्रस्त परिस्थिती लक्षात घेता पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून, पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली एपीआय राजू सांगळे, पोलिस उपनिरीक्षक अमोल दुकळे, योगेश महाजन पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, वाल्मीक समाजाचे सामाजिक नेते मिथुन बारसे यांना या प्रकरणी चौकशी कामी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते, चौकशीनंतर रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.