चोपडा : प्रतिनिधी
शहरातील एका भागात पाच वर्षीय बालिकेवर २५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना मंगळवारी घडली. परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीस तत्काळ अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात असलेल्या शिवारात एक परिवार सालदरकीचे काम करतो. परिवारातील पाच वर्षीय बालिका दुपारी ३ वाजेच्या सुमारास खेळत असताना आरोपी नियाल किरदार वास्कले (२५, पिलाऱ्या, ता. वरला, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याने मुलीस खाऊच्या बहाण्याने जवळ असणाऱ्या झोपडीत नेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली. ही घटना परिसरातील लोकांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. पिडीत मुलीचे आई-वडील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात जमलेल्या जमावाने आरोपीस चोप दिला. घटनास्थळी पोलिस पोहोचले.
पोलिसांनी आरोपी आणि पिडीत मुलगी यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश पाटील व अन्य डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली. आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने बोलण्याचा मनस्थितीत नव्हता. डॉ. चंद्रकांत बारेला यांनी पोलिस प्रशासनास मदत केली. उपजिल्हा रुग्णालयात उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलिस निरीक्षक मधुकर सावळे, पोलिस उप निरीक्षक जितेंद्र वलटे, भुसारे आदींनी बंदोबस्त राखला.