भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील रेल्वेच्या दगडी पुलाखाली असलेल्या नाल्यामध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या दगडी पुलाखालून २४ तास वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणी गावठी दारूचा अड्डा आहे. येथे दारू पिऊन अनेक जण रस्त्यावर पडतात. अनोळखी व्यक्ती दारू पिऊन पडल्याचा अंदाज परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बाजूलाच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे खासगी क्लासेससुद्धा आहेत. यामुळे या रस्त्यावरील दारू अड्डे बंद करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. संध्याकाळी सहा वाजता अनोळखी मृतदेह नाल्यात आढळल्याचे समजतात पोलिस प्रशासन या ठिकाणी पोहोचले. तसेच जेसीबीद्वारे मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला. यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.