मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना गेमचेंजर ठरली आहे. सरकारने यापूर्वीही अनेक योजना राबवल्या आहेत, पण या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे. त्यानंतर आता राज्यातील नवजात बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने ‘श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये जागतिक महिला दिनी (८ मार्च) जन्मलेल्या नवजात बालिकांच्या नावाने १० हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) करण्यात येणार आहे.
श्री सिद्धिविनायक न्यासाच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘भाग्यलक्ष्मी योजना’ मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम मुदतपूर्ती झाल्यानंतर १८ वर्षांनंतर मुलीच्या शिक्षणासाठीच वापरणे बंधनकारक असेल. हा प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून, मंजुरीनंतर लवकरच योजनेचे निकष जाहीर केले जाणार आहेत.
श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या २०२४-२५ आर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्नात विक्रमी वाढ झाली असून ते १३३ कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि भाविकांच्या उदंड प्रतिसादामुळे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. आगामी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी १५४ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे न्यासाने म्हटले आहे.
मुंबईमधल्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने मुलींसाठी एक खास अशी योजना आणली आहे. आठ मार्च रोजी म्हणजे महिला दिनाच्या दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपयांचे ठेव (फिक्स्ड डिपॉझिट) केली जाणार आहे. श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी असं या योजनेचं नाव आहे. राज्य सरकारच्या मान्यतेसाठी ट्रस्टकडून हा प्रस्ताव सादर केला गेलाय.
८ मार्चला जन्मलेल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपयांची मुदत ठेव केली जाणार आहे. ‘लेक वाचवा व लेक शिकवा’ मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी ट्रस्टकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.